कारंजा हे पौराणिक व ऐतिहासिक नाव ! श्री. करंज ऋषींनी वसविलेले ! पूर्वी ह्या गावास करंज नगरी म्हणून ओळखत. ह्या गावात पाण्याचे दुर्भिक्ष होते म्हणून करंज ऋषींनी हातात कूदळ घेऊन तलाव खोदण्यास सुरुवात केली. ह्याच वेळी उत्तरेतून एक ऋषिंचा संघ येथे आला. त्यांनी आप-आपल्या कमंडलूतील अभिमंत्रीत जल तेथे ओतले आणि एक मोठा जलाशय तयार झाला ! हा जलाशय आजही ऋषीतलाव ह्या नावाने ओळखल्या जातो. ही करंज नगरी जैनांची काशी म्हणूनही ओळखल्या जाते. येथे तिन जैन मंदिरे आणि एक जैन गुरुकुल आहे.
परंतु, हे कारंजा गाव भगवान श्री. दत्तात्रयांचा द्वितीय अवतार असलेल्या श्री. नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे जन्म ठिकाण म्हणून अधिक ओळखल्या जाते. ह्या ठिकाणी असलेल्या श्री. माधव आणि सौ. अंबा काळे (नगरनाईक) ह्या गरीब दांपत्याचेपोटी इ.स. १३०० मध्ये श्री. नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्म झाला. जन्म होताच हे बालक इतर बालकांप्रमाने रडले नाही, त्यांचे तोंडून ॐ हा उच्चार बाहेर पडला ! बालकाचे नाव शालिग्राम ठेवण्यात आले, पण त्यांना नरहरी म्हणत.
पुढे नरहरी ३, ४ वर्षांचे होऊनही ॐ खेरीज काहीच बोलत नसे. पण त्यांना इतर लोक जे बोलत ते कळत असे. नरहरीच्या मातापित्यांना बालक मुका होतो की काय ? अशी भिती वाटायला लागली, बालक आणखी थोड़े मोठे झाल्यावर बालकाने आपल्या पित्यास माझा उपनयन संस्कार करा असे खुणेने सूचित केले. त्याचा उपनयन संस्कार करावा असे माता-पित्यांच्याही मनात होते, पण मुलगा काहीच बोलत नाही आणि उपनयन संस्कारासाठी लागणारे द्रव्यही नाही ह्या विवंचनेत नरहरीचे आईवडील असतांना बालकाने आतल्या घरातील लोखंडी पहार आणली व तिचे सुवर्णात रूपांतर झाले. द्रव्याचा प्रश्न सुटला आणि घरातील सदस्यांनी उपनयन संस्काराची तयारी सुरु केली.
कारंजावासीयांना उपनयन संस्काराची बातमी कळाली. लोक उपहास करू लागले, मुका मुलगा गायत्रीमंत्र कसा म्हणेल ? पण उपनयन संस्कार ठरला आणि झाला ! आई कडून भिक्षा घेण्यासाठी आल्यावर बटूने ऋग्वेदातील ऋच्या म्हणून पहिली भिक्षा स्वीकारली ! नंतर इतर वेदातील ऋच्यासुद्धा अस्खलीतपणे म्हणायला सुरुवात केली. लोक आश्चर्याने थक्क झाले ! हा बाळ सामान्य नाही, हे करंजवासियांचे लक्षात आले.
उपनयन संस्कार झाल्याबरोबर बालकाने माता-पित्यास देशाटनास जाण्याची परवानगी मागितली तेंव्हा माता व पिता अतिशय व्यथित झाले. आतापर्यंत आपण बोलला नाहीत, आणि आता बोलायला लागला तर देशाटनास जाण्याच्या गोष्टी करता आहात, हे योग्य नाही असे मातापित्यांनी बोलुन दाखविले. तेव्हा मातापित्यांच्या आग्रहास्तव महाराज एक वर्ष थांबले. अंबा मातेला जुळी मुले झाली आणि ती मुले ३ महिन्याची झाल्यावर मातापित्यांची परवानगी घेऊन नरहरी बालक देशाटनास निघाले !
काही दिवस महाराज वाराणसी येथे राहिले. तेथे कृष्णसरस्वती नावाचे वृद्ध संन्यासी होते. त्यांनी नरहरीचे आचरण व योग्यता पाहून त्यांना संन्यास दिक्षा देण्याचे ठरविले. अशा प्रकारे बालक नरहरी श्री. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज नावाने प्रसिद्ध झाले ! पुढे बद्रिकेश्वर व उत्तर हिंदूस्थानची यात्रा करून जवळपास ३० वर्षानंतर आपल्या सर्व शिष्यासह कारंज्यास आई-वडिलांच्या भेटीस आले. आता आईला ४ मुले व एक मुलगी झाली होते. कुटुंब समृद्ध स्थितीत होते.
तीन दिवस कारंज्यास थांबून महाराज दक्षिणेकडे निघाले. मातेला अतिव दुःख झाले. पण स्वामींनी आईला सांगितले की, माझी आठवण झाली की गंधात बोटे बुडवून ह्या माडीवरील भिंतीवर शिंपडावे म्हणजे तुला माझे दर्शन होइल ! त्या भिंतीला आजही नरहरीची भिंत म्हणून ओळखतात व ती आजही पहावयास मिळते.
आणि अशा प्रकारे मातेचे समाधान करुन स्वामी महाराज सर्व शिष्यांसह दक्षिणेकडे गेले आणि ते तिकडेच राहिले ! बासर, भिलवडी, गाणगापूर, नरसोबावाडी, औदुंबर इकडेच अनेक चमत्कार करुन त्यांनी लोकांना भक्तिमार्गास लावले. ते परत कारंज्यास आलेच नाहीत. त्यामुळे पुढे कारंजा हे गाव श्री. नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे जन्मस्थळ आहे, हे विस्मरणात गेले ! पण इ.स. १९०५ साली नरसी नामदेव येथील चातुर्मास आटोपून प.पू. श्री. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज वाशिमला आले. तेथे काही कुटुंबीयांना अनुग्रह देऊन अमरावतीस जाताना ते कारंज्यास आले. कारंजाला बिंदुतिर्थाच्या काठावर एक समर्थ शिष्य रोकडाराम महाराजांनी स्थापन केलेला काळा मारोती आहे, त्या मंदिरात ते थांबले. प्रातःकाळी स्नानासाठी बिंदु तिर्थावर आले. तेथे कारंजाचे पोलिस पाटिल श्री. बाळाभाऊ महाजन यांचाही प्रातःस्नानाचा नियम होता तेही तेथे आले होते. कोणी संन्यासी आहेत असे पाहून श्री. महाजनांनी त्यांना नमस्कार केला. त्यावेळी स्वामींनी त्यांना आमच्या महाराजांचे हे जन्मस्थान आहे, ते कोठे आहे ते आम्हास दाखवा असे विचारले. त्यावर श्री. महाजन म्हणाले की आपले महाराज कोण ? हे आम्हास माहित नाही.
परंतु थोडा विचार केल्यावर महाजन महाराजांना म्हणाले की स्वामी येथे एक हवेली आहे.ती एका सावकाराने श्री. काळे ह्यांचे कडून विकत घेतली होती, पण ते त्या हवेलीत राहू शकले नाहीत. तेथे त्यांना आरतीचे आवाज येत असत कधी वेदमंत्र ऐकायला यायचे म्हणून त्या घुडे सावकारांनी समोरची मोकळी जागा घेऊन तेथे निवासस्थान बांधले व श्री. काळे ह्यांचे कडून घेतलेली हवेली अडगळीची हवेली म्हणून दुर्लक्षीत पडली. मी आपणास तेथे घेऊन जातो.
श्री. महाजनांनी प. पू. थोरल्या स्वामींना त्या हवेलीत आणले. त्यावेळी श्री. घुडे सावकार घरी नव्हते परंतू श्री. महाजनांनी प. पू. स्वामींना ती हवेली दाखविली आणि असे सांगतात की, प. पू. थोरल्या स्वामींची तेथेच भावसमाधी लागली ! थोड्या वेळाने ते सामान्य स्थितीत आल्यावर हेच आमच्या महाराजांचे जन्मस्थळ आहे, असे त्यांनी सांगितले आणि ते पुढे मार्गस्थ झाले ! श्री. घुडे सावकार घरी आल्यावर त्यांना घरच्यामंडळींनी ही वार्ता सांगितली, त्यावर सावकारांनी स्वामींच्या शोधार्थ माणसे पाठविली परंतु त्यांना श्री. वासुदेवानंद सरस्वती स्वामींचे दर्शन झाले नाही.
ह्याच काळात राजमहेंद्रिचे प. पू. ब्रह्मानंद सरस्वती स्वामी महाराज ह्यांना श्री. नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची मूर्ती गाणगापुरलाच स्थापन करायची होती ! परंतु त्यांना दृष्टांत झाला की, “ येथे निर्गुण पादुका आहेत, त्या पुरेशा आहेत ! आपणास काही करावयाचे असल्यास आमचे जन्मस्थान विदर्भात कारंज्यास आहे, तेथे करा ! ” दरम्यान त्यांची व प. पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ह्यांची भेट झाली असता त्यांचे कडून प. पू. ब्रह्मानंद स्वामींना कारंजा हे श्रींचे जन्मस्थळ असल्याचे कळले ! प. पू. ब्रह्मानंद सरस्वती स्वामी महाराज श्रींच्या दृष्टांतानुसार कारंज्यास आले. प. पू. थोरले स्वामी महाराज ज्या मारोती मंदिरात उतरले होते तेथेच ते उतरले. त्यांना श्री. महाजनांनी पूर्वी श्री. काळेचा असलेल्या व आता श्री. घुडे सावकाराच्या ताब्यात असलेल्या वाड्यात नेले. काही दिवसापूर्वी आम्ही एका संन्यास्याला घेऊन ह्याच वाड्यात आलो होतो आणि त्याच संन्याशांनी “ हे आमच्या महाराजांचे जन्मस्थळ आहे असे सांगितले होते ” महाजनांनी स्वामींना सांगितले होते. त्यावेळी मात्र श्री. घुडे सावकार वाड्यात नव्हते म्हणून. प. पू. थोरले स्वामी व त्यांची भेट झाली नसल्याचेही महाजनांनी सांगितले.
ह्यावेळी मात्र श्री. घुडे सावकार घरीच होते, ते स्वामींच्या भेटीस आले असता प. पू. स्वामींनी त्यांना, “ हे आमच्या महाराजांचे जन्मस्थळ आहे. आम्हास येथे श्रींचे मंदिर बांधणे आहे. आपला हा अडगळीचाच वाडा म्हणून पडलेला आहे, आपण आम्हास हा वाडा दिल्यास आम्ही तेथे मंदिर उभारू ” असे म्हटले. परंतु श्री. घुडे सावकारांनी तो वाडा प. पू. ब्रह्मानंद स्वामींना देण्याचे नाकारले !
असे सांगतात की परत प. पू. ब्रह्मानंद स्वामींना दृष्टांत झाला की, “ आपण ह्या ठिकाणाहून तेवलेले निरांजन घेऊन पूर्वेकडील वटवृक्षाच्या परिसरात फिरा, ज्या ठिकाणी हे निरांजन विझेल तेच आमचे जन्मस्थान आहे असे समजा !” त्याप्रमाणे स्वामीजींनी तेवलेले निरांजन घेऊन पूर्वेकडील वटवृक्षाच्या परिसरात परिक्रमा केली व आज जेथे श्रींची मूर्ती विराजमान आहे तेथे ते निरांजन विझले ! ती जागा स्वामींना कारंजे वासियांनी उपलब्ध करून दिली यावेळेस मात्र श्री. घुडे सावकारांनीही त्यासाठी मदत केली. मंदिराची जागा निश्चित करून मंदिर बांधण्यास सुरुवात झाली.
आता, प्रश्न श्रींच्या मुर्तीचा निर्माण झाला ! श्रींचे चित्रच उपलब्ध नव्हते ! तेंव्हा प. पू. ब्रह्मानंद स्वामींनी जे. जे. स्कुल ऑफ़ आर्टस चे प्रिंसिपॉल श्री. रा. ब. आठवले ह्यांना पद्मासन घातलेल्या बाल संन्याशाचे चित्र काढून देण्यास सांगितले ! त्यावेळी तेथे मी. सॉलेमन हे ख्रिश्चन चित्रकारही होते ! ते म्हणाले की, “ आठवले साहेब चित्र काढतीलच, पण मीही चित्र काढू इच्छितो ! ” दोन्ही चित्रकारांनी श्रींची चित्रे वेगवेगळ्या ठिकाणी काढले पण त्यांची चित्रे एकसारखीच आली ही आश्चर्याची बाब आहे !
असे सांगतात की त्या चित्रकारांना स्वप्नात श्रींनी दर्शन देऊन मला नीट न्याहाळून पहा व चित्र काढा असे सांगितले होते ! प. पू. ब्रह्मानंद स्वामींना चित्र मिळालीत. त्यानुसार जयपूरला त्यांनी स्वतःजाऊन त्या चित्राप्रमाने मूर्ती तयार करुन घेतली ! मंदिर आधीच तयार झाले होते. चैत्र वद्य द्वितीया शके १८५६ म्हणजेच १ एप्रिल १९३४ रोजी मुर्तीची प्राणप्रतिष्ठा नाशिकचे वे. मू. बारे शास्त्री ह्यांचे नेतृत्वाखाली झाली. मंदिरात श्रींची पूजा कशी करायची ह्याची आचारसंहिता प. पू. ब्रह्मानंद स्वामींनी तयार करून दिली !
तसेच येथील पूजाऱ्यास इतरत्र पौरोहित्य करता येत नाही. मंदिरात आचारी व पुजारी ह्यांचेसाठी स्वतंत्र स्नानगृह आहे तेथे स्नान करुन जवळच्या खोलीत वस्त्रांतर करुनच पाकगृहात किंवा गर्भगृहात जावे लागते ! घरून स्नान किंवा वस्त्रांतर करुन आलेले चालत नाही. सोवळे कडक असावे, स्वयंपाक विहिरीच्या पाण्यानेच व इंधनावरच व्हावा. श्रींचा नैवेद्य माध्यान्हकाळी १२ वाजता व त्यानंतर आरती व्हावी. नंतर पुजारी, कारभारी व असल्यास श्रींचा भक्त ह्यांना प्रसाद मिळावा असा दंडक प. पू. श्री. ब्रह्मानंद स्वामी महाराजांनी घालून दिला त्याचे आजही काटेकोरपणे पालन होते हे विशेष उल्लेखनीय आहे !
प. पू. ब्रह्मानंद स्वामींनी आपल्या शिष्यांकडून १५१/- रु. चा कायम स्वरूपी निधी घेतला होता. प्रत्येक दिवशी त्या भक्ताच्या नावाने पूजेचा संकल्प होत असतो. अशा प्रत्येक दिवशी ३ पूजेचा शाश्वत निधी त्यांनी उभारला व त्यावेळच्या RBS बाँड मधून तो गुंतविला, सुमारे ७३०००/- रु. चा निधी तत्कालीन विश्वस्त मंडळाकडे सोपवून त्याच्या व्याजातूनच संस्थानचा दैनंदिन खर्च चालावा अशी व्यवस्था श्री. स्वामींनी करून दिली.
प. पू. ब्रह्मानंद स्वामींकडे पैसा राहिला नाही. तेव्हा त्यांनी आपल्या जवळील सर्व चांदीची पूजेची व संध्यावंदनाची उपकरणे विकून, तो पैसा स्थानिक विश्वस्तांकडे दिला. आणि त्यांना एक स्वयंपाक घर व भोजना करता एक पडवी उभारायला सांगितली ! पुढे एक वर्षाने त्यांची शिष्या पार्वतीअम्मा ह्यांना मिळालेल्या निर्गुण पादुका मंदिरात मूर्तीच्या डाव्या बाजुस स्थापन करण्यात आल्या. श्री. दत्तसंप्रदायांत निर्गुण पादुकांना निरातीशय महत्व आहे ! ह्या निर्गुण पादुका सकाळी ८ वाजता बाहेर काढून त्यांच्यावर गंधाचा लेप दिला जातो व दुपारी १२ पर्यंत श्रींच्या बाजुस त्या ठेवल्या जातात ! नंतर त्या पादुका देव्हाऱ्यात ठेवल्या जातात. दुसरे दिवशी त्या परत सकाळी ८ वाजेपर्यंत बाहेर काढल्या जात नाहीत.
श्रींच्या पूजेचा ठराविक विधी आहे त्याप्रमाणेच पूजा केली जाते. पूजाऱ्यास त्रिकाल स्नान करावे लागते. पूजाऱ्याशिवाय इतर कोणालाही श्रींच्या गर्भगृहात प्रवेश दिला जात नाही !
महिमा करंज नगरीचा
https://drive.google.com/file/d/1UTmlpbEXYYwhQ3NQxCTwSVcULfVpGdUl/view?usp=share_link